उत्तर पत्रिकेचे सादरीकरण चांगले असेल तर परिक्षकाला कंटाळा न येता वाचन केले जाते आणि ते आवडल्यास आपोआपच गुण चांगले मिळतात. त्यासाठी आपल्या उत्तरपत्रिकेच्या गुणवत्तेबद्दल तडजोड करू नये. तेव्हडं चालतं असे म्हटल्यावर मार्क गळणारच. चांगल्या अक्षरासाठी विचारांचा वेग आणि हात चालणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाला भगवद्गीता मानून त्याच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन म्हणून वापर करावा. नियमित, दररोज १/२ तास अभ्यास, पाठ्यपुस्तकाचे ८-१० वेळा वाचन, पाठांतर आणि नियोजनबद्ध पध्दतीने प्रश्नपत्रिका सोडवताना अलंकारिक भाषेचा वापर करणे ही मराठीत यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे! धडा वाचल्यावर पुस्तकावर तारीख घालावी म्हणजे धडा किती वेळा वाचला ते कळेल.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने तयारी करावी. खालीलप्रमाणे रेखीव लिखाण करावे. उत्तर पत्रिका हातात आल्याबरोबर शक्य असल्यास २-३ पुरवण्या पेपरला जोडून टाकाव्यात. संपूर्ण पेपरला डावीकडे पोट समास व उजवीकडे एक समास आखावा. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे आवश्यक आहे. उपप्रश्न क्रमवार सोडवावेत. एखादा उपप्रश्न नंतर सोडवणार असल्यास त्याच्यासाठी जागा सोडावी म्हणजे परिक्षकाचा गोंधळ उडत नाही. उपप्रश्न संपल्यानंतर समासाच्या आतून रेघ मारावी, मुख्य प्रश्न संपल्यावर समासाच्या बाहेरून रेघ मारावी, व ती दुहेरी करावी.
प्रश्न क्रमांक एक निबंध हा सर्वात शेवटी लिहावा, बाकी सर्व शक्यतो क्रमानेच सोडवावेत. प्रत्येक प्रश्नाचे एक शीर्षक तयार करून ते प्रश्न क्रमांकाच्या पुढे लिहावे. उदा :-
प्रश्न २ : दीर्घोत्तरी प्रश्न (गद्य)
या प्रश्नप्रकारात उत्तराची किंमत वाढवणे महत्वाचे आहे.
८०% विद्यार्थ्यांना २ गुण मिळतात
१९% विद्यार्थ्यांना ३ गुण मिळतात
फारच थोड्या विद्यार्थ्यांना ३ १/२ गुण मिळतात
४/४ गुण मिळवणार विद्यार्थी विरळाच!
१) प्रस्तावना : लेखकाचे नाव, विशेषण, पुरस्कार, पुस्तक, कथासंग्रहाचे नाव, पाठाचे स्वरूप, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश ही माहिती २ वाक्यांमधे यावी.
२) मुद्दे : संकल्पनांचे स्पष्टीकरण, संदर्भ/पूर्वपीठीका, घटनांचा क्रम, प्रत्येक मुद्द्याल्या परिच्छेद, अवतरणे व म्हणी (नवीन ओळ) पाठतील नव्या शब्दांचा वापर आणि अधोरेखन
३) समारोप : दोन ओळींमधे आकर्षक करावा.
प्रश्न ३ :
१) एका वाक्यात उत्तरे- पुस्तकातील शब्दांचा वापर- धड्यात न सापडणारे पूर्ण वाक्य तपशीलांसकट तयार करावे- शुध्दलेखनासाठी गुण कापले जातात.
२) विधान पूर्ण करा- पूर्ण केलेला भाग अधोरेखित करणे
३) कोण कोणास म्हणाले- वाक्य, कोण, कोणाला- शुध्दलेखन महत्वाचे
प्रश्न ४ : दीर्घोत्तरी प्रश्न (पद्य)
हा प्रश्न सोडवण्यासाठी कविता पाठ असणे आवश्यक आहे.
१) प्रस्तावना - लेखकाचे नाव, विशेषण, पुरस्कार, कवितासंग्रहाचे नाव
२) स्वरूप : उपमा, रुपक, कल्पना
३) आपल्याला कळलेला शब्दांचा अर्थ
४) कवितेचा आशय / गाभा
५) संकल्पना स्पष्टीकरण
६) समारोप : ज्याच्या आधारे उत्तर पूर्ण केले त्या ओळी अवतरणचिन्हात लिहिणे.
प्रश्न ५ :
१) संदर्भासहित स्पष्टीकरण :- कवितेतील ओळी जशाच्या तशा लिहिणे- संदर्भ - पद्यपाठाचे नाव, कवीचे नाव, कवितासंग्रह - स्वरूप : उपमा, रूपक, कल्पना- स्पष्टीकरण : आशय / सारांश (कवितेतून काय कळले)- विषेश / वैशिष्ट्य
२) एका वाक्यात उत्तरे द्या :- कवितेच्या ओळी लिहू नयेत, अर्थातील योग्य वाक्यरचना करावी.
प्रश्न ६ : व्याकरण
सराव केल्यास, अचूक लिहिल्यास पूर्ण गुण मिळवतात. वाक्प्रचारातील लिंग / वचन याकडे लक्ष द्या.
प्रश्न १ : निबंधलेखन
निबंधलेखनामधे दिलेल्या विषयांवरील विचारांची मुद्देसूद, क्रमवार मांडाणी आकर्षक पध्दतीने करायची आहे. त्यामधे शुध्दलेखन, हस्ताक्षर, मुद्यानुसार परिच्छेद, उदाहरणे, प्रसंग, संवाद, वचने, वाक्प्रचार आणि म्हणी या सर्वांचा समावेश असावा. यातील महत्वाच्या गोष्टींकडे परिक्षकाचे लक्ष वेधण्यासाठी अधोरेखन आवश्यक आहे.
१) वर्णनात्मक निबंध :
अनुभूतीचे हुबेहूब वर्णन, शब्द संपत्तीचे दर्शन आणि परिस्थितीचा भावनिक विचार यातून प्रसंग उभा करावा. हे करत असताना स्थळ अथवा व्यक्ती यांच्याविषयी सूक्ष्म निरिक्षण असल्याचे जाणवायला हवे. त्यासाठी हुबेहूब आणि सविस्तर "वर्णन" करावे. व्यक्तीच्या भावविश्वात डोकावता आल्यास फारच चांगले. प्रसंग, घटना रंगवाव्यात.
२) चरित्रात्मक निबंध :
महान व्यक्तींबद्दल माहिती जमवणे, त्यांच्या तोंडची काही वाक्ये टिपून ठेवणे आणि त्याच्या जीवनातील घटना, प्रसंगाची माहिती जमवणे आवश्यक आहे. चरित्रात्मक निबंध म्हणजे वृत्तांत नव्हे. एखादा प्रसंग रंगवून सांगणे आणि इतर प्रसंगांची धावती नोंद करणे निबंधाच्या आकारासाठी आवश्यक ठरते. जीवनातील अडचणी आणि त्यावर केलेली मात आणि त्यांची जडण घडण यावर प्रकाश टाकावा.
३) कल्पनात्मक निबंध :
हा निबंध एखादे स्वप्न, किंवा रम्य कल्पनेवर आधारित असतो. मनाला स्पर्शून जाणारी, आनंददायक कल्पना वाचणार्याचे वैचारिक मनोरंजन करणारी असावी. परंतू अवास्तव, स्वैर, हास्यास्पद, तोल ढासळलेल्या कल्पना टाळाव्यात. खालीलप्रमाणे काळाचे भान ठेवणे आवश्यक आहे.
जेंव्हा वीज जाते : वर्तमान
जेंव्हा पाऊस पडला : भूतकाळ
मी पक्षी झालो तर : भविष्यकाळ
या प्रमाणे कोणत्या काळात निबंध लिहायचा ते विचारपूर्वक ठरवावे.
४) आत्मकथन :
हा निबंध प्रथमपुरुषी (मी) लिहावा. अगदी जन्मापासून मरेपर्यंत घटनांची आवश्यकता नाही. प्रत्यक्षात अनुभवलेला एखादा सुखद, दु:खद प्रसंग, चांगली वाईट घटना रंगवून सांगणे महत्वाचे आहे. त्यासाठी निवडक अनुभवांचेच वर्णन करावे म्हणजे निबंध आटोपशीर होतो. पाल्हाळ लावू नये.
५) वैचारिक निबंध :
एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजूंची आपल्याला नीट जाणीव असल्याचे वैचारिक निबंधातून व्यक्त करता येणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्या बाजूचे समर्थन करताना विरोधी बाजूचे खंडण करायचे आहे. हे करत असताना तुमची कारण मिमांसा, विचारवंत व्यक्तीचे म्हणणे, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा सद्य परिस्थिती यांचे भान ठेवावे म्हणजे निबंध आकर्षक होतो.
प्रश्न ७ : कथालेखन
गोष्ट सांगताना बोली भाषा वापरली जाते. सॉफ्ट टोन असतो आणि गोष्टीत उत्सुकता निर्माण करून शेवटपर्यंत टिकवली तर गोष्ट छान जमते.
कथेचे शीर्षक कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर जास्त चांगल्या पध्दतीने सुचते. ते कथेच्या डोक्यावर मधोमध लिहावे व शक्यतो एक-दोन शब्दांचेच असावे.
केवळ दिलेले मुद्दे एकत्र करून वाक्य तयार करणे म्हणजे कथा नाही. कथेची मध्यवर्ती कल्पना, रुपरेषा समजावून घेऊन आपली कल्पनाशक्ती वापरून मनोरंजक आणि नैतीक शिक्षण देणारी कथा लिहावी.
कथेतील घटना समजावून घेऊन सुरुवातीला त्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती करणारी वाक्ये लिहिणे आवश्यक आहे.
पात्रांना, स्थळांना, नद्यांना, डोंगरांना नावे द्यावीत. कथा भूतकाळातच असावी. कथेत जिवंतपणा आणण्यासाठी किमान दोन ठिकाणी छोटे संवाद असावेत. कथेमधे वाक्प्रचार, म्हणी, विरामचिन्हे आणि शुध्दलेखन हवे.
एकेका मुद्याला एक एक परिच्छेद करावा. ३-४ परिच्छेद असणे आवश्यक आहे.
शेवट परिणामकारक आणि आकर्षक असावा. कथेच्या तात्पर्याला एक गुण असतो.
प्रश्न ८ : सारंश लेखन / उतार्यावरील प्रश्न :
उतार्यावरील प्रश्न सोडवावेत. त्यापूर्वी उतारा एक दोन वेळा वाचून पहावा. प्रश्नांची उत्तरे तिथेच असतात. ती शुद्धलेखनाचे भान ठेउन लिहिल्यास चांगले गुण मिळवता येतील.
सारांश व शीर्षक पसंत पडेलच असे नाही. सारांश लिहिताना उतार्यातील अर्थपूर्ण व आवश्यक भाग स्वत:च्या भाषेत लिहावा. उतार्यातील अलंकार व सविस्तर वर्णने टाळावीत.
प्रश्न ९ : पत्रलेखन :
पत्र डाव्या पानावर सुरु करावे आणि उजव्या पानावर संपवावे, म्हणजे आकर्षक दिसते. वाचताना पाठवणारी व्यक्ती प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहे असे वाटले पाहिजे म्हणून अनौपचारिक पत्रात आपलेपणाची भाषा वापरायला हवी.
औपचारिक पत्राचा विषय समजावून घ्यावा, कळल्यास तेच लिहावे म्हणजे थोडक्यात सांजून वेळेची बचत होते व गुण सुध्दा चांगले मिळतात. वस्तूची ऑर्डर देताना व्ही.पी. ने पाठवा, वेळेवर पाठवा असे लिहावे, ही विनंती नको!
१. पत्र लिहिणार्याचा पत्ता
२. दिनांक
३. मायना
४. विषय : औपचारिक पत्रातच फक्त
५. नमन
६. मुद्दे
७. समारोप
८. मायना
९. स्वाक्षरी
१०.लिफाफा :
अ)तिकिट
ब) प्रति : ज्याला पाठवायचे आहे त्याचा पता
क) प्रेषक : पाठवणार्या व्यक्तीचा पत्ता
प्रश्न १० : जाहिरात :
मुद्दा ठासून सांगणे५/७ ओळीअवाजवी शब्द नकोतवर्तमानपत्रातील जाहिराती वाचून कात्रणे काढावीत
प्रश्न ११ : वृत्तांत :
घटनेची माहिती नसलेल्या लोकांकरता घडलेली हकीकत सांगण्यासाठी वृत्तांत लेखन करायचे आहे. याचे शीर्षक शेवटी ठरवून लिहावे म्हणजे जास्त परिणामकारक होईल. घटनेची जागा व दिनांक व्यवस्थित लिहून प्रथम थोडक्यात ओळख करून द्यावी. त्यानंतर योग्य क्रमाने नेमकी बरोबर वाक्ये लिहून वृत्तांत सादर करावा. व्यक्ती, इमारती, रस्ते, पूल इत्यादींची नावे असावीत. एका गावात एका कलेक्टरेने ध्वजारोहण केले असा वृत्तांत लिहू नये.
Wednesday, August 15, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment